मन आणि बुद्धी
15 नोव्हेंबर 2025
मन आणि बुद्धी यात नेहमीच संघर्ष चालू असतो. मन म्हणजे भावना. आपल्याला जे सुख आणि सोयीचं होईल, त्यामागे मन धावतं, पुष्कळदा त्यात सारासारविचार नसतो. म्हणजे आपण जे करणार ते योग्य की अयोग्य? हा जो विचार बुद्धीच्या पातळीवर करायचा, त्याला मन पूर्णपणे डावलून टाकतं. व्यसन म्हणजे मनाचा बुद्धीवर ताबा. दारू पिणे, जुगार खेळणे हे वाईट आहे, असं तर लहानपणापासूनच आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. तरीदेखील तो विचार डावलून मन पुनःपुन्हा त्या गोष्टींकडे वळत, कारण मनाने (क्षणिक सुखासाठी) आपल्यावरील बुद्धीचा पगडा भिरकावलेला असतो.
नुसते व्यसनाधीनच नाहीत, तर सर्वसाधारणपणे प्रत्येक जण कमीअधिक प्रमाणात असंच वागत असतो. यावर उपाय म्हणजे बुद्धीने मनावर ताबा मिळवणे! आणि ते सोप्प आहे का? तर नाही. समजा, मला आमरस आवडतो आणि एक वाटी आमरस खाल्यानंतरही मला दुसरी वाटी हवी असते, तेंव्हा माझ्या मनात द्वंद्व सुरू होतं. 'आता पुरे, नाहीतर बाकीचे काय म्हणतील' असं बुद्धी मला सांगत असते, पण त्याचवेळी 'काय हरकत आहे आणखी एखादी वाटी आमरस खाल्ला तर, रोज थोडंच असं मिळणार?' अशी भलामण मन करत असतं.
इथे थोडीफार 'to be or not to be' (दुसरी वाटी घेऊ की नको) अशी परिस्थिती निर्माण होते. जर मनाने बुद्धीवर ताबा मिळवला तर आपण दुसरी वाटी घेतो. बहुतेक भारतीय दर्शनात (तत्वज्ञानात) शमन आणि दमन यांची तुलना आहे, व सर्वच तत्वज्ञानात दमनाला योग्य मानलं आहे. फक्त चार्वाक व थोड्याफार प्रमाणात ओशो(रजनीश) यांचे विचार सोडून!
चार्वाक अस्तित्ववादी होते, जे समोर दिसतं, तेच प्रमाण; म्हणून त्यांनी म्हटलं, 'यावज्जीवेत सुखं जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत।' "कर्ज काढा, पण मजेत रहा, स्वर्ग, नरक कोणी पाहिलाय!" पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता. ओशो म्हणतात, 'जर इच्छा किंवा वासना प्रबळ असतील तर भोगून घ्या, मोक्षाची घाई कशाला करता! अजून पुष्कळ जन्म बाकी आहेत.'
पण असे अपवाद सोडले तर सर्वच धर्मात मनाला लगाम घालणेच श्रेयस्कर मानले आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे एकदा इच्छापूर्ती झाली की त्यानंतर त्या इच्छेचा नाश न होता ती पुन्हा उसळी मारून वर यायला बघते. व ज्या क्षणी मन कमकुवत असेल तेंव्हा आपण तिला बळी पडतो. हे न संपणारं दुष्टचक्रच आहे जणू!
त्यामुळे तिची चव घेण्याअगोदरच तिचं दमन करणं श्रेयस्कर. 'ना रहेगा बास, तो ना बजेगी बासुरी।'.
---------------------
हे विचार इकडून तिकडून गोळा केलेले आहेत. प्रस्तुत लेखक नर्मदेतला गोटा च होता. बेमुर्वतखोर आयुष्य, बायको, पोरांची चिंता नाही, मनमानीपणा चालू होता.
परमेश्वराच्या कृपेने परमपूज्य मावशींच्या चरणांशी आल्यानंतर फरक पडू लागलाय.
Comments
Post a Comment