माझी गृहलक्ष्मी
- Get link
- X
- Other Apps
हा लेख 'महाराष्ट्र टाईम्स'च्या 23 जानेवारी 2027च्या सर्व आवृत्त्यात 'माझी गृहलक्ष्मी' या कॅप्शनने प्रकाशित झाला होता.
------
आमचं लग्न 1974 मध्ये झालं. पूर्वाश्रमीची ती विजयालक्ष्मी कामत. आजोळ गोव्याचं, पण वडील हुबळीचे उद्योगपती. त्यावेळी ती फक्त 24 वर्षांची होती. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होतो. दरम्यान काही कारण नसताना मी चांगली नोकरी सोडून धंदा करायचा म्हणून मित्रांबरोबर जॉईन झालो आणि नंतर वेगवेगळे उद्योग करत मित्रांकडून फसवून घेत राहिलो. मला नियमित उत्पन्न नव्हतं त्यामुळे कोंड्याचा मांडा करून तिला दिवस काढावे लागायचे आणि दुर्दैव म्हणजे मला याची जाणीवच नव्हती. या दरम्यान आम्ही सात वेळा भाड्याच्या जागा बदलल्या. जागा बदलताना सामानाची हलवाहलवी आणि त्यानंतर नवीन जागेत पुन्हा संसार उभा करण्याचा भार तिच्यावरच पडायचा. वेगवेगळ्या ठिकाणांहून मुलांना शाळेत ने-आण करायची हे सगळं तिलाच बघायला लागायचं. त्यावेळी डेक्कन जिमखाना (क्लब), चिन्मय मिशन, पुणे शहर युवक काँग्रेस नंतर मोठी काँग्रेस, लायन्स क्लब अश्या सर्वच क्षेत्रात 'कटी पतंग' प्रमाणे माझं विहरण चालू होतं. कारण त्यात ध्येय कुठलंच नव्हतं.
या गदारोळात प्रभात रोडवरच्या स्वतःच्या फ्लॅटमधली काही वर्षे सोडली तर तिच्या वाट्याला वनवासच आला. शेवटच्या उद्योगात बँकेचं कर्ज फेडण्यासाठी तो फ्लॅटही विकावा लागला. त्यातच माझी आई कजाग होती. ती सुनेला म्हणजे माझ्या बायकोला उठताबसता छळायची. अहंकारी स्वभाव, बेमुर्वतखोरपणा इत्यादी 'गुण' वारसाहक्कानंच मला आईकडून मिळाले होते. लग्नानंतर तिच्या माहेरच्यांना किंमत न देणे, त्यांच्या कार्यक्रमात सहभागी न होणं, यात मी प्राविण्य मिळवलं. त्यामुळे माहेरी आणि सासरी तिचा कायमच कोंडमारा झाला. या सर्वांचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला. उच्च रक्तदाब आणि मधुमेह तर मुक्कामालाच आले, त्याशिवाय 'आर्टरीयल फिब्रिलेशन' (हृदयाचे ठोके अचानक वाढणे) ज्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याशिवाय पर्यायच नसतो हा विकार जडला. नवऱ्याच्या अतिशहाणपणामुळे सर्व भोगावं लागतंय याचं दुःख तिने पचवलं. तिचं सर्व तारुण्यच बरबाद झालं. कुठलीही हौसमौज नाही, मनाजोगता नाटक-सिनेमासुद्धा तिला बघता आला नाही.
मुलांना आज चांगले संस्कार आहेत ही तिचीच देन आहे.माझा एव्हढा मन:स्ताप तिला होऊनही माझ्या तब्येतीला जरा खुट्ट झालं की तिची धावपळ सुरू होते. तिचा स्वयंपाक म्हणजे अन्नपूर्णेची थाळीच, समोरचा तृप्त होऊनच उठणार एवढा चवदार. कायमच दुसऱ्याचा विचार, दोघा मुलांचे प्रेमविवाह झाले, तिसऱ्याचं लग्न होऊ घातलंय. एवढा मनस्ताप सोसूनही, आपला छळ झाला, आपल्या सुनांचा होऊ नये म्हणून लग्नानंतर तिनं मुलांना वेगळं ठेवलं. 'सुनांना सासूचं दडपण नको, त्यांना त्यांचं आयुष्य मनाजोगतं जगु देत' हीच तिची भावना त्यामागे आहे. आई मुलांच्या गळ्यातली ताईत तर असतेच; पण सुनाही तिच्यावर जीव टाकतात. एक सून तर म्हणते, 'मला माझ्या आईशी बोलताना कधीकधी टेन्शन येतं; पण काकूंशी (म्हणजे सासूशी) बोलताना कधीही टेन्शन येत नाही. किंबहुना दोनतीन दिवस (तिच्याशी) बोलले नाही तर मला चैन पडत नाही.' तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं की मी सुद्धा अस्वस्थ होतो.
विस्तारभयास्तव खूपच गोष्टी गाळल्या आहेत. सांगितलं ते हिमनगाच्या पाण्यावरील टोकापेक्षाही कमी आहे. आज मागे वळून बघताना जाणवतंय की तिच्यावर झालेल्या अन्यायाची ही सल कायमच राहणार. किंबहुना मी ती सल बरोबरच घेऊन जाणार. तरीही या चुकांची जाहीर कबुली देण्याचं व्यासपीठ 'मटा'नं उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. शेवटी वाचलेली बोधकथा थोडी बदलून सांगतो.
मी मागे वळून माझ्या आयुष्याची वाटचाल बघत होतो. वाळूत माझी पावलं उमटलेली दिसत होती. लग्नानंतर दोन पावलांचे जोड दिसत होते. पण आश्चर्य म्हणजे माझ्या अडचणीच्या काळात एकच जोड दिसत होता. मी परमेश्वराला विचारलं, 'हे देवा, जिनं देवाब्राह्मणांसमक्ष माझ्याशी एकरूपतेची शपथ घेतली ती माझी अर्धांगी माझ्या अडचणीच्या काळात कुठे होती..?' परमेश्वर म्हणाला, 'मूढा, ती पावलं तिचीच आहेत, अडचणीच्या काळात तिनं तुला उचलून कडेवर घेतलं होतं म्हणून तर तू इथपर्यंत येऊ शकलास.'
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment