इतिहास आठवतो. अहिल्याबाई होळकर यांच्या पतीचे व दुर्दैवाने मुलाचे निधन झाल्यावर राघोबादादा त्यांच्या राज्यावर चाल करून गेले. अहिल्याबाईनी महिलांची फौज तयार करून त्या लढाईला सज्ज झाल्या व त्याचवेळी त्यांनी राघोबादादाला एक संदेशही पाठवला.
त्यांनी लिहिलं, 'माझा पराभव झाला तर कोणालाच आश्चर्य वाटणार नाही, पण तुमचा पराजय झाला तर? विचार करा.' राघोबादादा नी बिनशर्त माघार घेतली.
हे आठवायचे कारण इराण अमेरिका बवाल. ट्रम्पला इराणने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनवायला नकोत, अणुबॉम्ब बनवायला नको, कारण इस्राएलला धोका. एपस्टिनने अमेरिकन अध्यक्षाचं माकड केलंय, मदारी सांगतो तस नाचणारं.
आज यांच्यातल्या वाटाघाटी फिसकटल्या. आता म्हटल्याप्रमाणे ट्रम्पला इराणबरोबर युद्ध करावं लागणार. अफगाणिस्तान, इराक मध्ये अमेरिकेबरोबर युरोपीयन देशही होते, आणि आता अमेरिका एकटा आहे. आणि त्या देशाचं लष्कर आणि आयुधं तोकडी होती.
ट्रम्पने सायकॉलॉजीकल प्रेशर आणण्यासाठी *आर्माडा* मिलिटरी बिल्ड अपला ट्रम्पचा काऊबॉय शब्द, इराणच्या दिशेने आणला. पण इराण काही बधला नाही. खामेनेईने तर सरळच सांगितलं हिंमत असेल तर हल्ला करून दाखव.
त्यातच इराणने चीन व रशिया बरोबर नौसेनेची कवायत केली, त्यात खरीखुरी मिसाईल्स वापरली. त्यानंतर ट्रम्पच्या आर्माडातलं अब्राहम लिंकन हे विमानवाहू जहाज मागे हटून अरबी समुद्रात गेलं.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेला नाक तर वाचवायला हवं, मग त्यांनी लुटुपुटीच्या हल्ल्याचा प्रस्ताव दिला. आम्ही दोन ठिकाणी तुमच्यावर हल्ला करतो, तुम्ही आमच्या दोन ठिकाणांवर करा. इराणने तो प्रस्ताव फेटाळला व पुन्हा जाहीर केले, आमच्या भूमीवरचा कुठलाही हल्ला आमच्या संप्रभुतेला आव्हान समजलं जाईल. फार अगोदरच आणि पुनःपुन्हा इराणने सांगितलंच आहे की यावेळची लढाई आरपार होईल. तुम्ही सुरू केलीत तर संपवणार आम्ही!
(थोडक्यात DGMO एकमेकांकडे चहाला जाऊन 'आता आपली लढाई संपली' असा भातुकलीचा खेळ खेळणार नाहीत.)
तसाच पवित्रा इस्राएलचा होता. त्यांनी रशियामार्फत इराणला निरोप दिला की हा हल्ला अमेरिका करणार आहे, आम्ही त्यात भाग घेणार नाही, तेंव्हा आमच्यावर हल्ला करू नका. नुकत्याच झालेल्या 12 दिवसांच्या लढाईत ह्या अगोचरपणाचा इस्रायलला जबर फटका बसला, तेल अव्हीव व हायफा मधील मिलिटरी बेसेस बऱ्यापैकी उध्वस्त झाले, म्हणून तर नेत्यानाहूसारख्या रक्तपिपासूला अमेरिकेतर्फे युद्धबंदीची विनंती इराणला करावी लागली. इराणचं उत्तर स्वच्छ होतं, यापुढे अमेरिकेचा हल्ला हा तुम्हा दोघांचा एकत्रित हल्ला समजला जाईल.
अमेरिकेचे लष्करी तळ बहुतेक अरब राष्ट्रात आहेत, म्हणून इराणने त्यांना खुली धमकी दिलीय की तुमच्या तळाचा वापर अमेरिकेला करायला दिलात, तर तुम्हाला इराणविरोधात समजलं जाईल व तुमचाही बंदोबस्त केला जाईल. त्यामुळे बहुतेक अरबी देशांनी अमेरिकेला त्यांचे तळ वापरायला बंदी घातली आहे.
या संधीचा योग्य फायदा घेतला चीन व रशियाने. चीनच्या उपग्रहाद्वारे अमेरिकेच्या सर्व जहाजांची लाईव्ह स्थिती इराणला कळते. रशियाने आपली S400 ही अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा इराणला दिली आहे. ज्याप्रमाणे भारत पाक युध्दात चीनने आपली विमाने व इतर आयुधे टेस्ट केलीत, तोच प्रकार चीन इथेही करणार आहे. यात चीन रशियाचं नुकसान काहीच नाही, पण अमेरिकेला अपशकुन करण्याची संधी मिळते.
त्यात एक ड्रोन अब्राहम लिंकन जवळ आला म्हणून अमेरिकेने पाडला. पण तो सर्व्हीलंस ड्रोन होता, व त्याने बेस स्टेशनला लाईव्ह फीड दिला होता. जमिनीवर असते तशी संरक्षण यंत्रणा जहाजभोवती नसते. यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं की अथांग समुद्रातही जहाज सुरक्षित नाहीत. ड्रोन येतो तर क्षेपणास्त्रेही येतीलच.
आपल्या नेत्यांप्रमाणेच ट्रम्प आणि नेत्यानाहू गर्जना करत असले तरी ट्रम्प मनातून नक्कीच टरकलेला दिसतो. कारण आमच्या सेनेला इराणने घाबरायला हवं असा अनाहूत सल्लाही देतोय. दोन आठवडे झाले, गेल्या वेळेप्रमाणे हल्ला मात्र करत नाही.
युद्धात इराण अमेरीकेचं जे व्ह्यायचं ते होईल, पण इराणने अब्राहम लिंकन बुडवली तर अमेरिकेचं नाकच कापलं जाईल. आणि हीच तर चीन आणि रशियाची चाल आहे.
इस्राएलची तेल अव्हीव व हायफा पूर्णपणे नेस्तनाबूत करू, हा इशारा इराणने दिलाच आहे. हे राष्ट्रचं नकाशावरून जायला हवं. जर्मनीतील त्यांच्यावरच्या अत्याचारामुळे जगाची त्यांना सहानुभूती होती, म्हणून पॅलेस्टाईन चा भाग कापून त्यांना वसवल. त्यांनी हातपाय पसरायला सुरुवात तर केलीच, पण युनोत ठरल्याप्रमाणे पॅलेस्टाईनला राष्ट्राचा दर्जा द्यायलाही तयार नाहीत. हमासच्या मूर्ख हल्ल्याचा बदला म्हणून त्यांनी गाझा पट्टीत 70हजार लोक मारले, त्यातले एक तृतीयांश तर लहान मुलं होती.
आता अमेरिकेला माघार घेण्यासाठी चर्चा हवी होती. ती मावळली. लढाई करायची म्हटलं आणि इराणच्या मिसाईल्सनी विमानवाहू नौकेची धावपट्टी जरी खराब केली तरी अमेरिकेचं नाक कापलं जाईल.
झाकली मूठ सव्वा लाखाची होती, उघडी झाली तर सव्वा पैशाची होईल.
पाहूया काय होतंय.
शुक्रवार 6 फेब्रुवारी 2025.
Comments
Post a Comment